
दोडामार्ग : गेले काही दिवस सातत्याने वन्य हत्ती काजू बागायतीत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी काजू बागायतीत जाणे सोडले आहे. त्यामुळे विशेष हेड तयार करून अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत वनविभागाने द्यावी अशी मागणी केर - भेकुर्ली, मोर्ले ग्रामपंचायत यांनी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी माध्यमाना दिली. येत्या दोन दिवसात वरिष्ठाशी विचार विनिमय करून ग्रामपंचायतना वनविभागाने कळवावे अन्यथा तालुका कार्यालयात ठिय्या मांडला जाईल असा इशाराही दिला आहे.
केर - भेकुर्ली सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, मोर्ले सरपंच संजना धुमास्कर, उपसरपंच संतोष मोर्ये यांनी माहिती माध्यमाना दिली.
दिलेली माहिती अशी की, मोर्ले आणि केर परिसरात हत्ती एकत्र येऊन फिरत आहे. जर लोकेशन पाहणी केली तर कोणाच्या ना कोणाच्या काजू बागेत त्यांचा वावर असतो. हत्ती हल्ल्यात शेतकरी मृत्यू झाल्यानंतर शेतकरी घाबरले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शेतकरी काजू बागायतीत गेले नाहीत. पडलेल्या काजू बिया त्याच दिवशी जमा केल्या नाहीत तर साळीदर, सांबर आदी प्राणी ते खातात त्यामुळे उत्पन्न मिळत नाही हाच पिकाचा हंगाम आहे. याबाबीचा विचार करून विशेष अहवाल करून वनविभागाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दयावी.