वैभववाडीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार दत्ताराम महाराज नागप यांचे निधन

पंढरपूरच्या वारीत घेतला अखेरचा श्वास
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 31, 2025 19:22 PM
views 76  views

वैभववाडी : तालुक्यातील आखवणे पुनर्वसन गावठण येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप (वय ६०) यांचे आज पहाटे पंढरपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. "पांडुरंगाच्या नामस्मरणात रमलेल्या या वारकऱ्याने वारीतच शेवटचा श्वास घेतला.या घटनेने वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.

 श्री नागप हे आपल्या परिवारासह २९ ऑक्टोबर रोजी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला गेले होते. गुरुवारी रात्री त्यांनी कीर्तन सादर करून भगवान विठ्ठलाच्या चरणी वारी केली. त्यानंतर आपल्या निवासस्थानी परतल्यावर पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

  दत्ताराम  नागप हे केवळ कीर्तनकार नव्हते, तर समाजकार्य, श्रद्धा आणि शांततेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या वडिलांपासूनच कीर्तन परंपरेचा वारसा त्यांनी पुढे नेला. मुंबईतील बेस्ट खात्यात अधिकारी पदावरून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर ते पूर्णपणे समाजकार्यात गुंतले होते.

ते अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अरुणा धरणग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळाले, तर आखवणे भोम व नागपवाडी पुनर्वसन गावठाणाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.शांत, संयमी, अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र होती. त्यांच्या निधनाने गाव, वारकरी संप्रदाय आणि सामाजिक चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.