
सावंतवाडी : २०१९ च्या निवडणूकीपूर्वी मी पुन्हा येईन म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या पाच वर्षात 80 तासांसाठी मुख्यमंत्री राहीले. तदनंतर विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री पदावर त्यांना समाधान मानाव लागल. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे. खुद्द फडणवीस यांच्याकडून ''मंत्री, मुख्यमंत्री झालो तर....!'' अशाप्रकारचे विधान केल्याची एक क्लिपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार! अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच सरकार मागची अडीच वर्ष कार्यरत आहे. यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात येईल असं भाकित राजकीय नेतेमंडळी करत आहेत. यातच ''महाराष्ट्रातील जनतेची एकच भावना आहे. आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे," असं विधान अमित शाह यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जाहीर सभेत केलं. यावरुनच फडणवीस पुढील मुख्यमंत्री असल्याचे संकेत शाहांनी दिलेत अशी चर्चा सुरु झाली. असं असतानाच अमित शाहांनाच थेट मुख्यमंत्री कोण असेल ? यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर अमित शाहांनी हसतच उत्तर दिलं. ते म्हणाले, ''तुम्ही जो मुख्यमंत्रिपदासंदर्भात जो प्रश्न विचारला त्याचं मी आधी उत्तर देतो. कारण, त्या उत्तरानंतर आता प्रश्न विचारायला ज्यांनी हातवर केले आहेत जे पुन्हा हात वर करणार नाही," असं अमित शाह यांनी म्हणताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हसू लागले. स्वत: अमित शाहही यावर हसले. त्यानंतर पुढे बोलताना शाह यांनी, "सध्या महाराष्ट्रात युती सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदेंजी करत आहेत. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार ? हे तिन्ही पक्ष एकत्र बसून हे ठरवतील. आम्ही शरद पवारांना कोणतीही संधी देणार नाही," असं उत्तर दिलं.
यातच मनसे नेते राज ठाकरेंनी भाकित वर्तवतल गेलं आहे. ''एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन म्हणून उत्तम आहे. महायुतीचं सरकार सत्तेत येईल असा माहोल आहे. मनसेच्या आमदारांशिवाय ते सत्तेत बसणार नाहीत, आमच्या आमदारांची गरज त्यांना लागेल. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे हे मीच नाही तर अमित शहा देखील सांगत आहेत. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत असं ते सांगतायत'' असे विधान राज ठाकरेंनी केलय. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा आहेत.
या चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर सध्या एक फोन कॉल व्हायरल होतोय. यात दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस म्हणतायत, ''महायुती टीकवायची आहे. सरकार पुन्हा आणायचं आहे आम्ही लोक मंत्री, मुख्यमंत्री झालो तर पुढे चांगलं होईल !'' असं विधान त्यांनी केले आहे. एका अपक्ष उमेदवाराशी बोलतानाचा हा संवाद असून सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात तथ्य किती आहे हे यथा अवकाश समोर येईल न येईल मात्र तूर्तास तरी या निमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.