
सावंतवाडी : अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांची पाहणी पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याची आणखी एक संधी दिली आहे. आता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांसाठी ई पिक नोंदणी महत्त्वाची आहे.भात पिकाला हमीभाव मिळत आहे. त्या नोंदणीसाठी आणि अन्य नुकसान भरपाईकरिता नोंदणी गरजेची आहे.शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी आता २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, असे प्रमोद गावडे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पीक पाहणीचे फोटो त्याच दिवशी ॲपवर अपलोड करणे आवश्यक आहे, ज्या दिवशी पीक पाहणी केली जाईल.रात्रीच्या वेळी पीक पाहणी करू नये, कारण अंधारामुळे पिकांचे फोटो स्पष्ट दिसत नाहीत.या मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व शेतकऱ्यांनी वेळेत आपली ई पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रमोद गावडे यांनी केले आहे.