
बांदा : बांदा येथील निमजगावाडी ते पाटो पूल मार्गे मासळीमार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज माजी सैनिक निलेश सावंत व बांदा ग्रामस्थांनी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नाईक यांची भेट घेत उपोषणाची सूचना दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की हा रस्ता दोन-तीन महिन्यापूर्वीच केलेला असून सात लाख रुपयांचा विकास निधी त्यासाठी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु प्रत्यक्षात काम पाहिले असता हे काम बोगस व निकृष्ट साहित्य वापरून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असून देखील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या निकृष्ट आणि बोगस कामामुळे निमजगा, वाफोली व आळवाडी येथील ग्रामस्थ, शेतकरी, शाळकरी मुले यांना येणे जाणे सुद्धा शक्य होत नाही. तसेच या रस्त्यावरील बांधलेली मोरीची भिंत ही पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत असून यात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांनी आरोप केला. या कामाचा कंत्राटदार याला काळ्या यादीत टाकण्यात यावे व संबंधित अधिकारी यांच्यावर शासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. व 15 ऑगस्ट पूर्वी अशी कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सहकाऱ्यांसह सामुहीक उपोषणास बसणार असल्याची सूचना त्यांनी गटविकास अधिकारी श्री नाईक यांना दिली.
यावेळी माजी सैनिक निलेश सावंत यांच्यासोबत भाजपा बांदा शक्ती केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, बुथ अध्यक्ष राकेश केसरकर, सामाजिक कार्यकर्ते गिरीश भोगले व हेमंत दाभोलकर आदी उपस्थित होते.