माणगाव वाचनालयात 'अनुभव कथन स्पर्धा' !

महिला दिनाचं औचित्य !
Edited by: भरत केसरकर
Published on: March 11, 2024 08:09 AM
views 172  views

कुडाळ : श्री. वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगावमध्ये महिला दिनानिमित्त "बचत गटाच्या माध्यमातून फायदा " या विषयावर वैयक्तिक अनुभव कथनाची स्पर्धा वाचनालयाच्या कै. जगन्नाथराव राणे सभागृहात घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी परशुराम चव्हाण वाचनालयाध्यक्ष हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनिषा गिरीश भोसले सरपंच माणगाव व योगिता ज्ञानेश्वर तामाणेकर यशस्वी उद्योजिका माणगाव या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्नेहा फणसळकर उपाध्यक्षा यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला 17 महिला बचत गटांना आमंत्रित करण्यांत आलेले होते. उपस्थित महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचे  गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले‌. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले अनुभव कथन करीत उपस्थितांना बोधपर मार्गदर्शन केले.

संचालक शरद कोरगावकर यांंनी महिला दिनावर आधारित स्वरचित कवितेचे वाचन केले. याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर "बचत गटाच्या माध्यमातून झालेला फायदा "या विषयावर वैयक्तिक अनुभव कथनाची स्पर्धा  सुरू करण्यात आली. स्पर्धा संपल्यानंतर पी.बी.चव्हाण यांनी अध्यक्ष पदावरून बहुमोल मार्गदर्शन केले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. अनघाअर्जुन बावकर, द्वितीय क्रमांक प्रज्ञा प्रवीण भिसे, तृतीय क्रमांक शर्वणी चंद्रशेखर मेस्त्री तर उत्तेजनार्थ सौ.रेखा संजीव दड्डीकर यांनी क्रमांक पटकावले. या कार्यक्रमाला संचालक स्नेहा माणगावकर, सदाशिव पाटील, विजय पालकर तर माजी सैनिक तथा सैनिक पतपेढीचे अध्यक्ष शिवराम जोशी उपस्थित होते.

वाचनालयाचे ग्रंथपाल प्रज्ञा कविटकर, सहाय्यक ग्रंथपाल अजित आर्डेकर,लिपिक अनुष्का आर्डेकर ,कर्मचारी श्री.अमोल केसरकर यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली. आभार प्रदर्शन स्नेहा माणगावकर यांनी केले. प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना वाचनालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे.