व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छिमार कुटुंबाना नाहक अडकवण्याचा प्रकार : निलेश राणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 10, 2024 07:01 AM
views 348  views

मालवण : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छिमार कुटुंबाना नाहक अडकवण्याचा प्रकार सांगली पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने सुरु आहे. आम्ही मच्छिमार कुटुंबांसोबत कायम असून या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाणार आहे. कोणावरही नाहक कारवाई होऊ देणार नाही. अशी भूमिका भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी स्पष्ट केली. 

दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार जणांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे व्हेलं माशाची उलटी सदृश संशयितांकडून जप्त करण्यात आली असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयितांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. संबंधित विषयात सांगली पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल भारतीय जनता पार्टीने घेतली असून याबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. मच्छिमार कुटुंबांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मच्छिमार कुटुंबासोबत आहोत. असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होते असे सांगत कारवाई केल्या जातात. मात्र व्हेलं माशाची उलटी हा पदार्थ समुद्रातुन तरंगत किनाऱ्यावर येतो. कोणीही मच्छिमार हा पदार्थ तस्करी करून अथवा व्हेलं माश्याला इजा करून आणत नाही. काही वेळा असा पदार्थ किनारपट्टी भागात पडून असतो. जर हा पदार्थ कोणाला सापडला तर नियमानुसार ती ताब्यात घेणेबाबत नियमावली असावी. किनारपट्टी भागात राहणाऱ्या मच्छिमार कुटुंब नेहमीच शासकीय यत्रणेस सहकार्य करतात. त्यांचा वावर किनाऱ्यावर असल्याने असा कोणताही पदार्थ त्यांना मिळाल्यास त्यांना दोषी ठरवू नये. मच्छिमार बांधवांचे सहकार्य या सर्व गोष्टीत महत्वाचे असून यात मच्छिमार केंद्र स्थानी ठेवून त्याला राज मान्यता मिळावी. यासाठी भारतीय जनता पार्टी माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

फक्त सांगली पोलिसांकडूनच होणारी कारवाई संशयास्पद 

व्हेल माशाच्या उलटीची विक्री होते असे पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र यात कुठलीही सत्यता समोर येत नाही. ही उलटी खरी आहे का? कुठे विक्री होते? किती किंमत? याबाबत काहीही समोर येत नाही. न्यायालय सुद्धा कोणतेही ठोस पुरावे नसल्याने पोलिसांनी अटक केलेल्या संशयित यांना जमिन देते. त्यामुळे या प्रकरणात फक्त सांगली पोलीस करत असलेली कारवाई ही कट असल्याचा प्रकार वाटतो. याबाबतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.