
दोडामार्ग : शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक भारती शाखा दोडामार्गच्या वतीने प्राथमिक शिक्षकाना' BLO कामातून वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षक समितीने याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना दिले असून त्यात बी एल ओ कामांतून शिक्षकांना का वगळले पाहिजे याची सविस्तर बाजू मांडली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिक्षकांची बाजू मांडताना म्हटले आहे की, जि.प. प्राथमिक शाळा या काही 1 ते 4थी, 1 ते 5वीं व 1 ते 7 वी पर्यंत आहेत. सदर शाळांत वर्गनिहाय पाहता शिक्षक संख्या ही शाळानिहाय 1 कींवा 3 अशी आहे. क्वचितच शाळामध्ये 2 किंवा 4 शिक्षक असतात. प्राथमिक शिक्षकांना अध्यापन करताना सदर शिक्षकांना जास्तीत जास्त दोन - चार असे वर्ग सांभाळावे लागतात, त्यामुळे अध्यापनात एक प्रकारची संबंधीत शिक्षकाची कसरत होते. एका शिक्षकाला एका वर्गाचे आठ-नऊ तासिका घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच प्रत्येक वर्गाची दिवसानिहाय अध्यापनाचे नियोजनाची जबाबदारी संबंधीत शिक्षकांकडे असते त्यातून शैक्षणिक गुणवत्ता वाढ करावी लागते. अध्यापना बरोबर सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये तंत्रनिहाय मूल्यांकन करावे लागते. त्यामध्ये उपक्रम', प्रकल्प, यांचा समावेश आहे. त्याला अनुसरून परीक्षा व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा सराव घ्यावा लागतो. वरील मुद्द्यांचे महत्व व जबाबदारी मोठी आहे. त्याबरोबर शाळेतील विदयार्थ्याना नियमित शा.पो.आहार दयावा लागतो. सदर शा.पो. आहारची दीवसानिहाय धान्य देण्यापासून ते रजिस्टर नोंदी हे संबंधीत शिक्षकांना ठेवावे लागतात. प्रत्येक शाळेला अनुदान प्राप्त असते सदर अनुदान खर्च करणे व खर्च केलेल्या अनुदानाचे नोंदी ठेवणे हे काम शिक्षकच करत असतात. तसेच शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक सभा घ्याव्या लागतात व इतिवृत्त लिहावी लागतात. विध्यार्थ्यांसाठी सा. फु. द. पा. योजना, उपस्थिती भत्ता' अशा विवीध योजनांचा लाभ देण्यासाठी कागदपत्र तयार करावी लागतात., शालेय पोर्टल वरील कामात प्रत्येक विध्यार्थ्याची आधार नोंदणी पासून पोर्टलवर विविध प्रकारची कामे करावी लागतात.
प्रशासनाकडून दर दिवशी प्राप्त परीपत्रकांची माहीती ही संबंधीत शाळेच्या शिक्षकाला देणे क्रमप्राप्त असते: अशा प्रकारे विविध प्रकारची अशैक्षणिक कामेही प्राथमिक शाळेतील शिक्षकच करत असतात. तसेच आजची परीस्थीती पाहता शिक्षक भरती होत नसल्यान शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहे.
त्यामुळे आमच्या निवेदनाचा सहानुभूतिपूर्वक विचार करून सदर BLO कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे, असे विनंती निवेदन जिल्हाधिकारी यांना शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष मणिपाल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.