युती करून लढलो तरी मी भाजपाचीच : चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 06, 2023 18:45 PM
views 237  views

मालवण : मालवण तालुक्यातील चाफेखोल ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भाजपा शिवसेना शिंदे गट युतीच्या  रविना घाडीगावकर 154 मते घेत विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार मयुरी घाडीगावकर यांचा पराभव केला. मयुरी घाडीगावकर यांना 115 मते मिळाली.  तर 6 मते नोटाला मिळाली. या विजयानंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने त्यांचे स्वतंत्र सत्कार केले. भाजपा कार्यालयात भाजपाने सत्कार केला. यावेळी रविना घाडीगावकर यांनी मी भाजपाचीच उमेदवार होती. शिवसेना शिंदे गटाने आपल्याला पाठिंबा दिला होता. युती करून लढलो असलो तरी मी भाजपाचीच असल्याचे रविना घाडीगावकर यांनी सांगितले. 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनीही चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर या भाजपच्याच असल्याचे सांगितले. जनतेने भाजपचा सरपंच निवडून दिला आहे. त्यामुळे तेथील विकासकामे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चाफेखोल गावचा विकास करण्यात येईल असे स्पष्ट केले.

मात्र, कालच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रविना घाडीगावकर यांच्या उपस्थितीत शिवसेना गटाने गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे,  तालुकाप्रमुख राजा शाहीन यांनी रविना घाडीगावकर या शिवसेनेच्याच असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच युती धर्म न पाळणाऱ्या भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर टिका केली होती. मात्र, आज निवडणूक निकालानंतर सरपंचपदी विजयी होताच रविना घाडीगावकर यांनी मी भाजपाचीच असल्याचे लेखी लिहून दिले. त्यामुळे राज्यात युतीत असलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजपात या विषयावरून तु तु मै मै होण्याची शक्यता आहे.