
सावंतवाडी : सावंतवाडी शहरांमध्ये काल रात्री आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत लाईट गायब झाल्यामुळे शहरातील नागरिकांचा आज फार मोठा उद्रेक दिसून आला. सर्वपक्षीय नेत्यांनी आज सकाळी ११ वाजता सावंतवाडी वीज वितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी उप कार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे आणि मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. ३३ के.व्ही. लाईनचा मेंटेनन्स केले का ? लाईट नसल्यामुळे व्यावसायिक व इतरांच्या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण ? असा सवाल बबन साळगावकर यांनी केला.दरम्यान माजी आमदार राजन तेली या ठिकाणी उपस्थितीत राहून अधीक्षक अभियंताविनोद पाटील यांना दूरध्वनी द्वारे खडे बोल सुनावले. जमत नसेल तर नोकऱ्या सोडून जा असा इशारा त्यांनी दिला. सरकारकडून सर्व सुविधा पूरवून देखील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेले आठ दिवस लाईटच्या या खोळंब्यामुळे ग्रामीण व शहरातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. याला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. कृषी पंपाला लाईट नाही याबाबत आता लोकांचा उद्रेक झाला आहे. आणखी लोकांचा उद्रेक होण्याची आपण वाट पाहू नका असा इशारा उपस्थितांनी अधीक्षक अभियंता पाटील यांना दिला. तर या सर्व निष्काळजीपणाला अधीक्षक अभियंता जबाबदार आहेत असा आरोप यावेळी केला. शासनाने डीपीडीसी व इतर माध्यमातून महामंडळाला पैसे दिले आहेत. मग पावसापूर्वी आपण नियोजन का केले नाही? असा प्रश्न त्यांनी अधीक्षक अभियंतांना केला. या प्रश्नाबाबत ३० मे रोजी विज महावितरणचे सर्व अधिकारी, ठेकेदार व नागरिक यांची बैठक आयोजित केली आहे.यावेळी शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागात हि लक्ष देणे गरजेचे आहे अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केली. उप कार्यकारी अभियंता यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने हे प्रकार घडत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. एप्रिलमध्ये निवडणूकीचे काम असल्याने प्रांताधिकारी यांनी देखभालीचे काम करण्यास आपणास मनाई केल्याचे यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी सांगितले. आपण लाईट देऊ शकत नाही तर प्रांताधिकाऱ्यांना सांगून प्रत्येकाला पाच लिटर रॉकेल द्यायला सांगा अशी मागणी यावेळी लोकांनी केली. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, दिपाली सावंत, महेश नार्वेकर ,रवी जाधव, बंड्या तोरस्कर, मनोज घाटकर, दत्ता सावंत, तारक गावडे, अभय पंडित, विशाल बांदेकर, नितीन गावडे, गुरु गवंडे, तारक सावंत, राजू शिरोडकर, संजू शिरोडकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.