
देवगड : EPS-95 पेन्शनधारकांचे जागृतीकरण अभियान २२ रोजी देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे. देशातील सुमारे १८७ विविध उद्योग धंद्यातील कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनंतर उतारवयात आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी या उदात्त हेतूने भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ अंमलात आणला व त्यामध्ये वेळोवेळी अनेक दुरुस्त्या नंतरच्या काळात झाल्या, कायदे झाले व त्या कायद्यांचे एकत्रीकरण करून त्यातून EPS 1995 पेन्शन योजना तयार करण्यात आली व त्याची अंमलबजावणी १६ नोव्हेंबर १९९५ पासून सुरू केली.तथापि ही योजना सुरू करताना जी आश्वासने दिली होती त्याला फाटा देऊन पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षिततेला सुरुंग लावून पेन्शनधारकांना जीवन जगणे असंभवनीय व दयनीय करून ठेवले आहे. व त्यामुळे अतिशय हालाखीचे आणि उपेक्षित,मृतप्राय जीवन पेन्शनधारकांना जगावे लागत असून त्यांचेवर अन्याय झाला आहे.याअन्यायाविरुद्ध EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती गेली १० वर्षे देशपातळीवर रात्रंदिवस लढा देत आहे.
सर्व प्रकारची सर्व स्तरावर आंदोलने करीत आहे.भेटीगाठी, पत्रव्यवहार करत आहे. तरीही 'गोड बोलून वाटाण्याच्या अक्षता लावणे'आणि'आश्वासनाव्यतिरिक्त' काहीही पदरात पडले नाही. सबब सर्वांच्या मनात सकारात्मकता निर्माण होऊन संघटन,बळकटीकरण, विस्तारीकरण आणि EPS-95 पेन्शनधारकांचे जागृतीकरण अभियान यानिमित्ताने राबविण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २२/०४/२०२५ रोजी EPS-95 पेन्शनसंबंधी माहिती देण्यासाठी EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक २२/०४/२०२५ रोजी देवगड EPS-95 पेन्शनधारकांचे जागृतीकरण अभियान राबविले जाणार आहे.
देवगड तालुक्यातील व देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग परिसरातील बहुसंख्य EPS-95 पेन्शनधारक सभासदांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे. व या पेन्शन बाबत सविस्तर माहिती घेता यावी यासाठी हे जागृतीकरण अभियान राबविले जाणार आहे.