
बांदा : विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी आज विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवानिमित्त ढोलताशांच्या गजरात, सुमधुर संगीताच्या साथीने ५० दिपांनी औक्षण करून नवागत विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली भेटकार्ड देऊन स्वागत करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके यावेळी वितरीत करण्यात आली. शाळेचा मार्च २०२४ चा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला. याबरोबरच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातून दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री आजगावकर यांचे द बुलक कार्ट हे वॉटर कलर पेंटींग अमेरिका येथे होणाऱ्या ओल्ड मास्टर्स गॅलरी या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जागतिक प्रदर्शन व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून अमेरिकेत होणाऱ्या चित्रप्रदर्शनात आजगावकर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्था पदाधिकारी, सदस्य, सल्लागार तसेच शिक्षक पालक संघ, पालक वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.