उद्योजक बापू नाईक यांचं निधन..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 30, 2023 18:42 PM
views 2166  views

कुडाळ : ओंकार डीलक्सचे मालक उद्योजक बापू नाईक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले ते 83 वर्षाचे होते. पत्रकार राजन नाईक यांचे ते वडील होत.


त्यांच्या या निधनामुळे उद्योगक्षेत्रातील एक तारा कोसळला असल्याचा सूर अनेकांनी  व्यक्त केला. उद्या सकाळी दहा वाजता तेंडोली येथील निवासस्थानी श्री देव रवळनाथ मंदिर नजीक आराववाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

 माहिती तंत्रज्ञानाचे युग येण्यापूर्वी जिद्द, चिकाटी,  मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर यश कसे खेचून  आणावे? अपयशावर मात करून यशाचे उत्तुंग शिखर कसे गाठावे ? याचा परिपूर्ण अभ्यास करून ज्येष्ठ उद्योजक बापू नाईक यांनी जे नावीन्यपूर्ण यश संपादन केले, ते आजच्या तरुण पिढीला माहिती तंत्रज्ञानाच्या युगात निश्चितच प्रेरणा देणारे आहे. त्यांची कार्यपद्धती तरुणांनाही लाजवेल, अशी होती . अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी वाटचाल करून गेल्या कित्येक वर्षांपासून एक यशस्वी उद्योजक म्हणून राज्यपातळीवर नावलौकिक मिळविला पर्यटकांचे केंद्रबिंदू ठरलेला दुर्वांकार मोटेल्स, विविधांगी अत्याधुनिक सेवेतील मानबिंदू ओंकार डीलक्स, परिपूर्ण  अद्ययावत सोयी-सुविधांनी सर्वांचे लक्ष वेधणारे आरएसएन  हॉटेल आणि लग्न समारंभ वा इतर विविध कार्यक्रमांसह सुमारे  सात ते आठ हजार क्षमतेचे उद्यमनगर, कुडाळ येथील वासुदेवानंद  ट्रेड सेंटर सभागृह असे त्यांचे नावाजलेले लक्षवेधी प्रकल्प आहेत बापू नाईक हे यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास येताना त्यांनी सुरुवातीला शाई व्यवसायातून केलेली वाटचाल अतिशय खडतर होती. बेळगाव ते रत्नागिरी असा सायकलवरून प्रवास करून त्यांनी या व्यवसायात केलेली यशस्वी वाटचाल ही त्यांच्या यशाचे गमक ठरली.

त्यांची ही प्रचंड धडपड निश्चितच तरुण वर्गाला व्यवसायाच्या दृष्टीने प्रेरणा देणारी आहे. अनेक उद्योगसमूहां करिता येथील तरुणांसाठी ते आदर्श आहेत. उद्यमनगरच्या याच परिसरात पर्यटकांचे केंद्रबिंदू ठरलेला दुर्वाकार मोटेल्स याठिकाणी १४ हून अधिक बंगलो अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहेत. या ठिकाणी विविध ३० ते ४० संतांच्या मूर्ती आहेत. संतांची भूमी असल्याचे अनोखे चित्र नाईक यांनी आपल्या कल्पक बुद्धीतून साकारले आहे. धार्मिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा सर्वच क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान होते तेंडोली गावच्या सर्वागीण विकासात त्यांचे फार मोठे भरीव योगदान होते गेले काही महिने त्यांची तब्बेत खालावली होती तरीसुद्धा अशा परिस्थितीत त्यांनी नेहमीच आपला उत्साह दाखविला त्यांनी अनेक गरिबांची मोफत लग्ने लावून दिली अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला उद्योजक राजन नाईक  प्रसाद नाईक यांचे ते वडील होत त्यांच्या मागे पत्नी भाऊ मुले मुलगी सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आज सायकाळपासून त्यांच्या एमआयडीसी निवासस्थानी सर्व क्षेत्रातील मान्यवर ,उद्योजक ,लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी एकच गर्दी केली होती.