पुस्तकं सुधारतात मस्तकं ! पुस्तकांची गोडी लावणारे उपक्रमशील शिक्षक

जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा
Edited by:
Published on: June 02, 2024 06:02 AM
views 303  views

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE च्या 'जागर' 'कोकणच्या साहित्य रत्नांचा', या विशेष कार्यक्रमात आपण बोलणार आहोत बाल साहित्यिक चळवळीतील महत्वाचे व्यक्तीमत्व मनोहर परब यांच्याशी. उपक्रमशील शिक्षकाबरोबरच संवेदनशील लेखक, कवी अशी त्यांची वेगळी ओळख. बाल मनाला अचूक ओळखत त्यांनी राबवलेल्या उपक्रमची दखल घेत्तली ते राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाने. बाल साहित्यासह 'मालवणी'पण जपत 'गावपण' आपल्या लेखनातून उलगडलं. एकूणच त्यांच्या या प्रवासाविषयी  कोकणसाद LIVE ची उपसंपादक जुईली पांगम यांनी या विशेष मुलाखतीतून जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.


1)
मुलांना घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकी पेशात असताना साहित्य क्षेत्राकडे कसे वळलात ?

आमच्या घरात कृषी प्रधान संस्कृती, शेतीशी निगडीत घरच जगणं.  तेच जगणं हा साहित्यातील जणू गाभाच. माझी आई लग्नात बारशात ओवी म्हणायची. रोजच काम करताना, जात्यावर काम करताना तिच्या ओव्या सतत कानावर पडायच्या. मला त्या जागृत करायच्या. मालवणी लिखाण करताना याच ओव्या त्या दिशेने खेचून घेत होत्या.  हा लोक व्यवहार मला त्या बाल मनाचा वेध घेणारा आईच्या ओव्यातून जाणवत होता. शिवाय शेतीची काम झाल्यावर आई वडील ओटीवर बसून गप्पा करायच्या ज्याला आपण मालवणीत गजाली म्हणतो.  त्यांच्या गजालीत एक 'स्पिरीट' जाणवायचं. हेच त्यांचं जगणं अनुभवत लेखनाकडे ओढला गेलो.  

2)
प्रामुख्याने बाल वाचकांसाठीच लिहावं असं नेमकं का आणि कशामुळे वाटलं ?

बाल साहित्य हे बाल विश्वच आहे. बाल साहित्य हे आनंद देणारे असावे. जिथे आनंद आहे तिथे बालपण रुजते. शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मुलांचा सहवासात कायम मिळतोय यातून त्यांच्यातील कुतूहल जाणवायचं. कथा, काव्य स्वरूपात मुलांची अभिव्यक्ती अंतर्मन पटलावर उमटत होती.  त्यांचं तेच कुतूहल, दैनंदिन जगणं, बालपण मनोरंजकच नव्हे तर आनंददायी जाणवलं. त्यातूनच बाल साहित्य लिहावसं वाटलं. बाल साहित्य मोठ्या प्रमाणात तर लिहिलं गेलंय. विं दा करंदीकर, न. मा. जोशी, डॉ. सुरेश सावंत, एकनाथ आव्हाड, नामदेव माळी, हरिहर आठलेकर, विठ्ठल कदम, कल्पना मलये,  यांसारख्या बाल साहित्य कवींनी बाल साहित्य मोठ्या प्रमाणात लिहील. या सारख्या साहित्यिकांमुळे लिखाणाची प्रेरणा मिळाली. 

3) बालकांसाठी लिहिताना विशेष आणि उल्लेखनीय असा उपक्रम राबवलात. तो म्हणजे मुलांनी लिहिलेल्या कविता असतील किंवा लेख यांचं संपादन करून ते प्रकाशित केला. ही कल्पना कशी सुचली आणि तो अनुभव नेमका काय होता ?

ग्रामीण भागातील मुलांच्या लिखाणाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. मुलांचे बालविश्व त्यांची अभिव्यक्ती पुढे आणण्यासाठी 'ऊब' काव्यसंग्रह,  उमलते भाव संवेदन, कोरोना लोकडाऊन, जीवनानुभव हे तीन मुलांनी संपादित केलेली पुस्तक आहे. यातून मुलांना आनंद देणं हा मोठा उद्देश या उपक्रमाचा होता. वर्तमानपत्रातून जेव्हा मुलांचे लिखाण प्रसिध्द झालं, तेव्हा त्यांचे खुलले चेहरे मलाही समाधान देऊन गेले. यातून मुलांना लिहिण्याचा आत्मविश्वास मिळाला. जेव्हा मुलांनाही आपण काहीतरी लिहावे, असं वाटू लागले, तिचं माझ्या कामाची पोचपावती होती. याचबरोबर वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजविण्यासाठी 'पुस्तक भिशी' हा अनोखा उपक्रम देवसू  शाळेत राबवला. यातून दर महिन्याला  मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ज्याच नाव येईल त्या विद्यार्थ्याला पुस्तकांचं कीट दिल जायचं. यासाठी शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक अशा अनेकांचे सहकार्य लाभलं. याला मुलांचा पालकांचा तेवढाच चांगला प्रतिसाद लाभला. हा उपक्रम अनेक शाळांनीही आपल्याकडे राबवला.  यातून वाचन संस्कृती चळवळ उदयास आली. 


3) शिक्षण विभाग किंवा बालसाहित्य संमेलने यांच्याकडून आपणास कसा प्रतिसाद मिळत गेला ? 

या उपक्रमाची अनेक साहित्यिक, सामाजिक संस्थांनी याची दखल घेतली, प्रोत्साहन दिल. शिक्षण विभागाने माझ्या कार्याची दखल घेत गौरविण्यात आले.  डॉ. नामदेव माळी, शिक्षण तज्ञ
न. मा. जोशी, शिक्षण विभागातील संचालक, उपसंचालक यांनी कौतुक केलं.  NCRT मध्ये देखील मुलांच्या या पुस्तक निर्मितीबाबत मला सन्मानित केलं. राज्य पाठय पुस्तकाच्या निर्मिती मंडळावर माझी निवड झाली. यातून बोली भाषा समृद्ध करणे आपली जबाबदारी आहे. रूढी परंपरा, चालीरीती पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सर्व समावेशक बाल साहित्य प्राथमिक शिक्षणात याचा समावेश करण्यासाठी राज्य पाठय पुस्तकाच्या निर्मिती मंडळाच्यामाध्यमातून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन. 

4)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल साहित्य चळवळ व एकूण साहित्य विश्व याबदल तुमची एकंदरीत काय निरीक्षणे आहेत?

 आज कवी, लेखकांनी बाल साहित्य अनेक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात  पुढे आणलंय. आजची परिस्थिती पाहिली तर आपली मुल मोबाईलच्या दुनियेत गुरफटलीत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, वाचन संस्कृती त्यांच्यात रुजवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यात विठ्ठल कदम यांचं नाव आवर्जून घेईन. त्यांच्या शाळेत बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं. तशीच शिक्षण विभाग, संस्थांच्या माध्यमातून असे आज उपक्रम राबवले जातात, ही समधानाची बाब आहे. बाल साहित्य समृद्ध करणे ही मोठी जबाबदारी आहे.  ग्रंथालय जशी प्रौढांसाठी काम करतात तशीच बालकांसाठी काम होण्याची आवश्यकता आहे.    

5) तुम्ही मालवणी बोलीतूनही काही काळ कविता लिहिल्या आहेत. मराठी प्रमाण भाषेतून व्यक्त होण्यापेक्षा मालवणीमधून लिहावं असं का वाटलं ?

नामदेव गवळी, श्री. साटम, महेश केळुसकर, ना. सी. परब, गोविंद काजरेकर, विठ्ठल कदम, दादा मडकईकर या दिग्गज व्यक्तींनी मालवणीतील लोक परंपरा, लोक व्यवहार  चांगल्या प्रकारे मांडला. मालवणीतील जगणे आपल्या लिखाणातून पुढे आणलाय. मालवणी नाट्यसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी लोक संस्कृती, मालवणी बोली सातासमुद्रापार पोचवली.  याच समृद्धीकरणं या अनेक लेखक, कवींनी केलय. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे मालवणी साहित्य  लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे. 


6) आजच्या स्पर्धेच्या युगात बालवाचन चळवळीसमोर कोणती आव्हाने आहेत असे तुम्हाला वाटते ?

आजच्या धावपळीच्या युगात मुलांवर दडपण आहे. संवाद कमी झालाय, ती बोलू पाहत नाहीत. मुलांमध्ये मोकळेपणा जाणवत नाही. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. यासाठी पालकांनी इतर पाल्याबरोबर आपल्या पाल्याची तुलना करू नये, त्यापेक्षा पाल्याची बौद्धिक क्षमता ओळखून, त्याच्यातील उपजत कौशल्यांना वाव दिला पाहिजे तरच मुले आपली प्रगती साधतील. तसेच, मुलांनीही अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चौफेर, अवांतर वाचनावर भर द्यायला हवा. त्यामुळे आपल्या क्षमता रुंदावण्यासाठी मदत होईल. यातूनच वाचन संस्कृती चळवळीला बळ मिळेल. 



7)
नव्या बाल साहित्यिकांना काय संदेश द्याल ?

आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे कवी लेखक आहेत त्यांना आदर्श मानून ती पायवाट शोधण्याचा प्रयत्न केला. पुढील जे लेखक, कवी, बालसाहित्यिक पुढे येण्याचा प्रयत्न कारतात त्यांनी आजच्या समाजातील चालीरीती, रूढी परंपरा याची जपणूक, लोकव्यवहार, लोकपरंपरा पुढे येण्याची गरज आहे. मालवणी भाषा, लोकनाट्य, संगीत टिकवण प्रत्येकाची गरज आहे. हा आधारस्तंभ आहे. लेखन करत असताना जागण्यासाठी लेखन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पुढील लेखक कवी यांनी पाठीमागे काय लिहिलेलं आहे हे शोधून आपण काय लिहाव याचा अंदाज बांधायला हवा.