पैसे मोजण्याचा बहाण्याने पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांची बँकेतच लूट

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 13, 2023 20:27 PM
views 435  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत भर दुपारी १२.३० ते १२.४५ वाजताच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती कडून हातोहात वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शिपाई कर्मचारी स्वप्नील सदानंद घाटगे (वय २१ वर्षे ,रा. फोंडाघाट) यांच्या हातातील रोख रुपये १ लाख खेचून घेऊन रक्कम मोजून देतो, असा बहाणा करत त्यातील २३ हजार ५०० रुपयांचे नोटा खोट्या असल्याचा सांगत  उर्वरित रक्कम त्या पतसंस्था कर्मचारी यांचेकडे परत दिली. त्या अज्ञात चोरट्यानी बँकेतून लगेच पोबारा केला.या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास केला असता संबंधित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.


याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण बाजारपेठ येथे असलेल्या वैश्यवाणी सहकारी पतसंस्थेचे शिपाई कर्मचारी  स्वप्नील सदानंद घाटगे (वय २१ वर्षे ,राहणार फोंडाघाट) हे खारेपाटण एस. टी. बस स्थानक येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संस्थेने दिलेले चलन घेऊन  पैसे काढण्यासाठी गेले होते. 


त्यांनी कॅश काऊंटर श्री. घाडगे  १ लाख रुपये घेऊन समोरील टेबलावर रक्कम मोजत असतानाच त्याच्यावर अगोदरच पाळत ठेवून बसलेला अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील रक्कम हिसकावून घेतली. या रक्कमेत काही ५०० रुपयाच्या नोटा खोट्या असल्याचे त्याला भासवून त्याचेकडील पैसे हात सफाईने व चलाखीने काढून घेत तेथून लगेच पळ काढला. आपली फसवणूक झाली ही बाब या कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने संबधित बँक अधिकारी यांना सांगितले. मात्र चौकशी करे पर्यंत सदर चोरटा पशार झाला.


घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव,उप पोलीस निरीक्षक शरद देठे, खारेपाटण पोलीस पोलीस उद्धव साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.पंचनामा करत सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संशयित आरोपीचे चेहरे सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. भर दिवसा बँकेत झालेल्या या प्रकरणामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सणासुदीच्या दिवसात बँकेतून रोखड लंपास करणारी टोळी असल्याचा अंदाज कणकवली पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात संबंधित गुन्ह्यात वापरलेली वाहने व ४ संशयीत आरोपी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.