नैसर्गिक अधिवासात म्हणजे कुठे ?

महाराष्ट्र, गोवा की कर्नाटक ? प्रश्न कायम ?
Edited by: स्वप्नील परब
Published on: September 23, 2025 20:33 PM
views 118  views

पणजी : गेल्या काही दिवसांपासून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेल्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीच्या स्थलांतरावरून वेगवेगळी माहिती समोर येतेय. महाराष्ट्राचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या हत्तीसह दोडामार्ग तालुक्यातील इतर हत्तींना ‘वनताराला’ हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली होती. मात्र, गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी ही शक्यता फेटाळून लावत, असा कोणताही प्रस्ताव गोवा सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओंकारच्या स्थलांतराच्या दिशेवरून विरोधाभास निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथील हत्तींच्या स्थलांतराची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, या हत्तींना गुजरातमध्ये नेऊन 'वनतारा' या ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण, वनमंत्री विश्वजित राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ओंकार हत्तीला 'वनतारा' हलवण्याचा कोणताही प्रस्ताव गोवा सरकारसमोर नाही. उलट, कर्नाटक राज्यातील इतर बंदिवान हत्तींच्या मदतीने ओंकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा सुरू आहे

तीन राज्यांमध्ये समन्वय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच या प्रकरणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीनही राज्यांमध्ये समन्वय सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, वन खात्याचे अधिकारी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वन खात्याच्या पथकांनी संबंधित भागाची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तज्ज्ञांची मदत घेऊन, हत्तीला कोणतीही इजा न पोहोचवता त्याचे जंगलात पुनर्वसन करण्याची तयारी करण्यात येत आहे. दसऱ्यानंतर ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. या तीनही राज्यांमधील समन्वयातून ओंकारला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे, दीपक केसरकर यांच्या घोषणेपेक्षा गोव्यातील सरकारची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे.