
दोडामार्ग : सोनावल येथील भातशेती पायदळी तुडवत हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यात शेतकरी शिवराम गवस यांचे नुकसान झाले आहे. हत्ती हाकलवण्यासाठी कार्यरत असणारे वनविभागाचे हाकारी मात्र अपयशी ठरल्याच्या उद्विग्न भावना शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहेत.
तळकट पंचक्रोशीत वावरणारे हत्ती तिलारी खोऱ्यात दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून या हत्तींनी येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. हे नुकसान सत्र सुरूच असून वनविभाग मात्र हत्तींना रोखण्यात अपयशी ठरल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. शनिवारी रात्री हत्तींचा कळप पाळये व सोनावल भागात वावरत होता.
सोनावल येथील शिवराम गवस यांच्या भातशेतीत हा कळप घुसला. संपूर्ण भात शेती हत्तींनी पायदळी तुडवली. यात शिवराम गवस यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागामार्फत हत्तींना हाकलवण्यासाठी हाकारी नेमले आहेत. मात्र तरीही हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेती, फळबागायतींचे नुकसान सुरूच आहे. त्यामुळे वनविभागाच्या या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून हत्तींना पिटाळून लावण्याची मागणी केली जात आहे.