
दोडामार्ग : काही दिवसांपूर्वी तिलारी खोऱ्यात आलेल्या ओंकार हत्तीने बांबर्डे गावात उपद्रव सुरु केला आहे. शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. बांबर्डे येथील शेतकरी ऋषभ देसाई यांच्या शेतीमध्ये ओमकार हत्तीने उभी पिके नष्ट केली असून, शेतातील पावर टेलर ट्रॅक्टर यांचेही मोठे नुकसान केले आहे.
बांबर्डे हेवाळे घाटिवडे परिसरात मागील २२ वर्षांपासून हत्तींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून, याकडे वनविभाग व शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक वेळा उपोषण, आंदोलन व निवेदने देऊनही शासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
हत्तींच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेती उद्ध्वस्त होत असून शेतकरी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की शेतकऱ्यांना “आता जगण्याचा मार्गच उरलेला नाही” आहे. ही अवस्था शासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तरी शासनाने या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन, ही हत्तीची ताबडतोब पकड मोहीम राबवावी. त्यांना त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडावे. अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांची जबाबदारी वनविभागाने घ्यावी अन्यथा आम्हा सर्व शेतकऱ्यांना वनविभागाविरोधात मोठा जनआक्रोश उभा करावा लागेल, असा इशारा - दत्ताराम देसाई यांनी वनविभागाला दिला आहे.










