
दोडामार्ग : तळकट गावचे कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांना नालंदा ऑर्गनायझेशन, पुणे या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुणे येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, ही तळकट गावासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद बाब ठरली आहे.
सरपंच सुरेंद्र सावंतभोसले यांनी आपल्या कार्यकाळात राजकारणापेक्षा गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. स्वच्छ गाव सुंदर गाव अभियान, स्मार्ट ग्रामपंचायत अभियान यांसह मूलभूत सुविधा, शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे, तसेच प्रत्येक घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला. युवकांना योग्य दिशा देणे, त्यांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे ही त्यांची प्रमुख नेतृत्ववैशिष्ट्ये आहेत.
गावातील गोरगरीब व गरजू नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. “एकनिष्ठ, एकत्रित व न्यायप्रिय गाव, सुंदर व स्वच्छ गाव ” या तत्त्वांवर काम करत त्यांनी तळकट गावाला विविध शासकीय पुरस्कार मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत देण्यात आलेला आदर्श सरपंच पुरस्कार हा त्यांच्या संवेदनशील, विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्वाचा सन्मान असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.










