
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात पाच हत्तींचा उच्छाद चालू असतानाच अजून दोन हत्तींनी काल रात्री हेवाळे घाटीवडे येथे हजेरी लावली. घाटमाथ्यावरून एक मादी आणि गणेश नावाचा टस्कर असे दोघेजण पुन्हा उतरल्याने हत्तींच्या संख्येत वाढ होऊन सात वर पोहोचली आहे. हातींची वाढती संख्या पाहता स्थानिक भयग्रस्त झाले आहेत. तसेच आता पासून शेतीच्या आणि मानवांचे रक्षण करण्याचे वनविभागाची कसोटी लागलेली आहे.
तिलारी खोऱ्यात पाच हत्तींचा धुडगूस चालू आहे. केर मोर्ले भागात उच्छाद मांडून हत्तीने आपला मोर्चा काही दिवस शिरवल, तळकट, कोलझर, झोळंबे या गावाकडे वळविला होता. शेत बागायतीने समृद्ध असलेल्या या गावांमध्ये गेली काही दिवस हत्तींनी धुडगूस घातला. नारळ फोपळीच्या बागावर यथेच्छ ताव मारून बागायती उध्वस्त केल्या. येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान करून या पाच हत्तींच्या कळपाने आता आपला मोर्चा पुनच्छ केर मोर्लेच्या दिशेने वळविला आहे. हा कळप शनिवारी रात्री निडलवाडी येथे हजर झाला. तिलारीच्या या दशक्रोशीत या पाच हत्तींचा वावर चालू असतानाच पुन्हा घाटमाथ्यावरून अजून दोन हत्तींनी हेवाळे घाटिवडे या ठिकाणी हजेरी लावली आहे.
यात मादी आणि नर असे असून सध्या त्यांचा वावर घाटिवडेत चालू आहे. यापूर्वी सतत वावर असलेल्या कळपात मादी दोन टस्कर व दोन पिल्लू यांचा वावर असताना नव्याने आलेले मादी हत्ती व टस्कर मिळून हत्तींची संख्या सात वर पोहोचली आहे. हत्तींची संख्या वाढल्याने पुन्हा ग्रामस्थ व शेतकरी भयग्रस्त झाले आहे. पाच हत्तींना आवरताना वनविभाची दमच्छाक होत आहे. आणि त्यात आता दोन हत्तींची भर पडल्याने वनविभागाच्या डोक्याचा ताप देखील वाढला आहे. आता पर्यंत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वनविभागाला गस्त घालणे हाता पलीकडे गेले होते. मात्र आता अजूनही त्यात जोखीम वाढली आहे. या हत्तींना वनविभाग कशाप्रकारे हाताळणार ही मोठी कसरत आहे.