
दोडामार्ग : कर्नाटक राज्यातील खानापूर येथे हत्ती पकड मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. त्याच धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पंचक्रोशीतील रानटी हत्तींना पकडा व आमची या त्रासातून मुक्तता करा. अन्यथा १० फेब्रुवारी पासून येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवासंघ जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील सरपंच व उपसरपंच यांनी मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
हेवाळे, केर, मोर्ले, तेरवण- मेढे, घोटगेवाडी, पाळये, सोनावल, कोनाळ, परमे, घोटगे आदी गावात हत्तीप्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. येथील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षे हत्ती संकटाने ग्रासले आहे. हाता-तोंडाशी आलेला हंगामी पिकाचा घास या हत्तीच्या तोंडात जातो आणि इथला शेतकरी मात्र उपाशी मरतो. याकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे. यासाठी जशी हत्ती पकड मोहीम कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्यात राबवली, तशीच मोहीम दोडामार्ग तालुक्यातील या हत्ती प्रवण क्षेत्रात राबवावी, अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली या पंचक्रोशीतील सरपंच व उपसरपंचांनी वनविभागाकडे केली. ९ फेब्रुवारी पर्यंत याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ दोडामार्ग वनविभागाच्या कार्यालयासमोर १० फेब्रुवारीपासून साखळी उपोषण करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.