
रत्नागिरी : जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊस व वादळवारा यामुळे महावितरणची यंत्रणा प्रभावित होत आहे. मात्र महावितरणचे कर्मचारी अंत्यंत चिकाटीने व जिद्दीने ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करत आहेत, याची प्रचिती भेलसई गावातील ग्राहकांना आला.
चिपळुण विभागांतर्ग येणाऱ्या धामणंद शाखा कार्यालयामधील भेलसई (ता.खेड) गावालगत वीज वाहिनी तुटून चार गावांचा वीज पुरवठा बुधवार (28 मे) रोजी रात्री बाधीत झाला. भेलसई व इतर गावांना वीजपुरवठा करणारी 11 केव्ही वीज वाहिनी तुटल्याने सुमारे 1100 ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला होता.
काळाकुठ्ठ अंधार असताना मुसळधार पावसात व वादळवाऱ्यांत काम करणे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या उजेडात ही 11 केव्हीची वाहिनी जोडून घेतली व रात्री 10.30 च्या सुमारास बाधित वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतूक करत आभार व्यक्त केले.