दोडामार्गमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडीत | कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी

Edited by:
Published on: May 24, 2024 14:25 PM
views 144  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याचा नाहक त्रास तालुका वासियांना होत आहे. त्यामुळे खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यात गेले चार दिवस लाईट बंद आहे. पावसाळयापूर्वी दरवर्षी हे प्रकार होत असतात. गेल्या पंधरा दिवसांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे व एक ते दोन दिवस तालुका अंधारात राहणे असे प्रकार होतच आहेत. यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यातील विद्युत मंडळ कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी यांची कमतरता असल्यामुळे लवकर भरती करावी. विजय निर्मिती करणारी कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत कंपनीचा महावितरणसोबत असलेला करार संपलेला आहे. सरकारने महावितरण व महालक्ष्मी कंपनीचा लवकर करार करावा व तिचा वीज पुरवठा संपुर्ण तालुक्याला करावा.

दोडामार्ग शहर ते साटेली भेडशी दरम्यान एक नविन सबस्टेशन महावितरणने प्रस्तावित केलेले आहे. त्यासाठी शासनाने एक एकर जमिन उपलब्ध करावी व जो प्रस्ताव सादर झालेला आहे, त्याला धिक तरतुद करून मंजुरी द्यावी. महावितरणच्या इन्सुली सब स्टेशन ते सासोली सब स्टेशन या दरम्यान असलेली ३३ के. व्ही. लाईन पूर्ण कोटेड करून मिळावी.  यासाठी प्रस्ताव सादर केलेला असल्याने त्याला आर्थिक तरतुदींसह मंजुरी देण्यात यावी. तसेच इन्सुली ते सासोली दरम्यान ३३ के. व्ही. भुमिगत नविन विद्युत लाईन टाकावी. दोडामार्ग तालुक्यात उद्भवलेल्या या समस्यांकडे लक्ष घालुन वारंवार होणाऱ्या विद्युत समस्येवर उपाय योजना करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.