ऐन चतुर्थीत साटेली-सातार्डेत वीजेचा गोंधळ !

बाबा कोरगावकर यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 21:18 PM
views 47  views

सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. याबाबत लक्ष वेधून सुद्धा वीज मंडळाचे कर्मचारी व अधिकारी सुशेगाद आहेत. याबाबत गावचे उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून असाच प्रकार सुरू राहिल्यास मळेवाड येथील उपकेंद्रासमोर ठिय्या  आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

आठवडाभर चतुर्थी पूर्वी आणि चतुर्थी नंतर गावात विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात हा प्रकार सुरू असल्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी समस्या सोडविण्यासाठी मळेवाड येथील वीज कंपनीच्या अधिका-यांकडे  पत्रव्यवहार केला होता. यात वीज वाहीन्यांना अडकणा-या झाडी तोडण्यात याव्यात तसेच अन्य समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली होती. मात्र, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी गावात प्रत्येक तासाला किंवा दहा ते पंधरा मिनिटांनी वीज पुरवठा खंडित होत आहे. चतुर्थीच्या काळात हा प्रकार सुरू असल्यामुळे ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा, सर्व ग्रामस्थांना घेऊन मळेगाव उपकेंद्राच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा श्री. कोरगावकर यांनी दिला आहे.