
सावंतवाडी: बांदा आणि परिसरातील नागरिकांना वीज बिलांशी संबंधित तक्रारींसाठी आता सावंतवाडीला जाण्याची गरज नाही. महावितरणने बांदा कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल १५ ते २० गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात, गेल्या काही महिन्यांपासून बांदा येथील नागरिक वाढीव वीज बिल, मीटर दुरुस्ती आणि नवीन जोडणी अशा विविध समस्यांनी त्रस्त होते. त्यांना तक्रारींसाठी ३० ते ३५ किलोमीटरचा प्रवास करून सावंतवाडीला जावे लागत होते. तिथेही अनेकदा अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या.
नागरिकांच्या या समस्येची दखल घेत भाजपच्या बांदा मंडल पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले होते. यात बांदा कार्यालयात महिन्यातून किमान दोन वेळा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणचे प्रभारी सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांनी २७ ऑक्टोबरपासून बांदा कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता बांदा आणि परिसरातील शेतकरी, दुकानदार, गृहिणी यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे, तसेच त्यांच्या तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन कार्यवाही केली जाईल.
या बैठकीत बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, मंडल उपाध्यक्ष गुरू कल्याणकर, उपसरपंच आबा उर्फ राजाराम धारगळकर, शक्ति केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, शहराध्यक्ष बाबा उर्फ नरसिंह काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, हेमंत दाभोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सुविधेबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.










