समाज माध्यमांवर व्हायरल होणारा संदेश चुकीचा

निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती
Edited by:
Published on: November 17, 2024 19:56 PM
views 634  views

सिंधुदुर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत असून या संदेशाद्वारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.  या संदेशामध्ये असे नमूद आहे की , ‘ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा. अशा प्रकारचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. या संदेशाचे जिल्हा प्रशासनाकडून खंडन करण्यात आले असून याबाबत सत्यता पुढीलप्रमाणे.. 

 मतदान यादी मधून मतदाराचे नाव वगळल्यास मतदान करता येत नाही. अशावेळी मतदाराने आपल्या नावाची नव्याने मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.  नाव नोंदवण्यासाठी नामनिर्देशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदाराला  संधी असते, त्यानंतर मतदार यादी मध्ये नाव नोंदविता येत नाही. त्यामुळे सध्या ज्या मतदाराचे नाव मतदार यादीमधून वगळले आहे त्यांना २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा असून कृपया नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये तसेच असा संदेश इतरांनाही फॉरवर्ड करू नये असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आवाहन केले आहे.