आचारसंहिता उल्लंघनाबाबत योग्य कार्यवाही करा

निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या सूचना
Edited by:
Published on: November 17, 2024 19:53 PM
views 224  views

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचासंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन होवू देवू नका. तसे झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशा सूचना नोडल अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या. 

शेवटचे ७२ तास, ४८ तास या कालावधीत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहिता पालन झालीच पाहिजे. कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास अजून त्यांच्या नेमणुका कराव्यात, मात्र कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती श्रध्दा पोवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे, परिवहन उपायुक्त विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, लिड बँकेचे श्री मेश्राम तसेच संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.

शेवटच्या कालावधीत प्रचार होत असताना होणारे आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष लक्ष देवून जबाबदारी पार पाडावी. कुठेही  जाहिर  प्रचार सुरू राहता कामा नये. भरारी पथकांनी चांगल्या प्रकारे सनियंत्रण करून अशा प्रचारावर बारीक लक्ष ठेवा. स्थिर पथकांनीही चांगल्या प्रकारे ॲक्टीव राहून कामे करावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी दिल्या.