
सावंतवाडी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने आज निवडणूक निरीक्षक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्र. ३ अंधेरी, मुंबई विवेक बसवंतराव घोडके यांनी सावंतवाडी शहराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक तयारी, मतदान केंद्रांची पाहणी केली.
निवडणूक यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेतला.तसेच विविध विभागांशी संवाद साधून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. तद्नंतर तहसील कार्यालय येथे भेट देऊन तेथील स्ट्राँग रूम व मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी केली. निवडणुकीसंदर्भातील नियोजन, सुरक्षा व्यवस्था, साहित्य उपलब्धता याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच टोपीवाला स्मारक तंत्रशाळा, तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मिलाग्रीस हायस्कूल, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, जि.प. प्राथमिक शाळा नं. ४, काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथील मतदान केंद्र पाहणी करण्यात आली. तसेच उपरलकर देवस्थान येथील स्थिर सर्वेक्षण पथकाची पाहणी करण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुयोग्य आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.










