5 हजार 31 लाभार्थी वंचित !

लाभार्थ्यांची E-KYC अपूर्ण
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 20, 2023 18:21 PM
views 183  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी 24 हजार 73 एवढी मंजूर यादी आहे. तर त्यामधील 19 हजार 391 शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्याने पी एम किसान सन्मान योजनेचे हप्ते जमा होत आहेत. तालुक्यात 2 हजार 421 एवढ्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्याने व 2 हजार 610 एवढ्या लाभार्थ्यांनी E-KYC पूर्ण केली नसल्याने 5 हजार 31 एवढे लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याची माहिती कुडाळ कृषी अधिकारी प्रवीण कोळी यांनी दिली.

तालुक्यातील वंचित असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने नवीन VNO मोबाईल ॲप तयार केले आहे. काढलेल्या नवीन आदेशानुसार विलेज नोडल अधिकारी म्हणून कृषी सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील सध्याची स्थिती तपासणे, E-KYC करणे व पी एम किसान पोर्टलवर नोंदणी करताना जमिनीचा तपशील भरणे तसेच या ॲपचा वापर करून ज्या शेतकऱ्यांचे अंगठ्याच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन होत नाही अशा शेतकऱ्यांना फेस ऑथेंटीकेशन E-KYC करणे यासाठी व लाभार्थ्यांची बँकांची आधार संलग्न केली असल्याची खातरजमा ग्राम नोडल अधिकारी करणार आहेत. तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या ई केवायसी व आधार लिंकिंग झाले नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार फोन केले जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे फोन न लागणे किंवा ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनीही पंतप्रधान किसान सन्मान योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण कोळी यांनी केले आहे.

तालुक्यात 125 महसुली गाव आहेत, कुडाळ तालुक्यात कृषी सहाय्यकांची 36 पदे मंजूर आहेत. मात्र नऊ कृषी सहाय्यक अधिकारी कृषी विभागाच्या इतर योजना राबवून पीएम किसान योजना राबवत आहेत. त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक पदांसाठी भरती होणे गरजेचे आहे. 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष मोहीम गावपातळीवर हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.