वन्य प्राण्यांच्या नुकसानीच्या धर्तीवर भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: March 01, 2025 11:08 AM
views 144  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यातील घोटगे गावासह अन्य दहा गावांमध्ये अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानी प्रमाणे देण्यासाठी मी संबंधित मंत्र्यांशी बोलेन. सरकारी अधिकारी शासकीय निकषाप्रमाणे काम करतात. केळी पीक बहुवार्षिक पीक योजनेत घेण्यासाठी प्रयत्न करेन. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जाईल, असे ठोस आश्वासन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी बांदा येथे शेतकऱ्यांना दिले.

घोटगे गावातील युवक नोकरीच्या मागे न लागता केळी उत्पादन व्यवसायात गुंतले आहेत. केळीच्या प्रत्येक झाडासाठी येणारा उत्पादन खर्च सुमारे ५०० रुपये आहे. चक्रीवादळाने केळी उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे या भागातील युवा शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्यांना आर्थिक बळ देण्याची गरज आहे. वन्य प्राण्यांपासून नुकसान झाल्यास वनविभाग २४० रुपये प्रति झाड भरपाई देतात. मात्र, चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झाल्यास केवळ १० रुपये भरपाई मिळते. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. वनविभागाप्रमाणे भरपाई मिळावी. तसेच केळी पीक बहुवार्षिक पीक योजनेत घेण्याची मागणी केली.

सुमित दळवी यांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा प्रखरपणे मांडल्या. यावेळी ना. नितेश राणे म्हणाले, प्रशासन सरकारी निकषानुसार पंचनामे करीत आहेत. ते त्यांना करू द्या. पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मी तत्पर आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संबंधित मंत्र्यांच्या दालनात बसून यावर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासित केले.

बांदा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या सभेत उपसरपंच आबा धारगळकर यांनी ना. नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी सभापती प्रमोद कामत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार, कृषी अधिकारी सौरभ कदम, मंडळ अधिकारी श्री. घाटगे, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मंदार कल्याणकर, संतोष नानचे, जावेद खतीब उपस्थित होते. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी विविध समस्यांचे निवेदन सादर केलीत. यावेळीं माजी सभापती अंकुश जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, दीपक गवस, विकी कवठणकर, बांदा ग्राम पंचायत सदस्य श्याम मांजरेकर, देवल येडवे, प्रशांत बांदेकर, साई काणेकर, शिल्पा परब, दीपलक्ष्मी सावंत, तनुजा वराडकर, रूपाली शिरसाट, श्रिया केसरकर, बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर, गुरुनाथ सावंत, सिद्धेश महाजन, सुनील राऊळ, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, विनेश गवस, साई धारगळकर, कैलास गवस, पपू कदम आदींसह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.