
सावंतवाडी : दहिसर-मुंबई येथील 'सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे' एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून या संस्थेमार्फत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. यावेळी दहिसर मुंबई येथील सुभेदार रावजी आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सेवा सहयोग फाऊंडेशनचे प्रतिनिधी दीपक गावडे,प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले,पर्यवेक्षक सुनील कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ,मळगाव ऐक्यवर्धक संघाचे कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ, माजी विद्यार्थी विवेक नार्वेकर, संदिप सामंत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कीटमध्ये २९४ दप्तरे वाटप करण्यात आली. प्रत्येक दप्तरामध्ये वर्षभर पुरेल एवढ शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यामध्ये वह्या, कंपास बॉक्स,या साहित्याचा समावेश आहे.
यावेळी दीपक गावडे म्हणाले, ही संस्था कोकणातील विविध शाळांना मदत करीत आहे.हे कार्य सतत १४ ते १५ वर्षे संस्था करीत आहे. खेड्यात काही गरीब मुलांना दप्तर सुध्दा मिळत नाही. हे न्यूनगंड त्यांच्यामध्ये राहू नये, यासाठी मी जेंव्हा या संस्थेमध्ये सहभागी झालो, तेव्हा ही संकल्पना आपण मांडली. त्याचबरोबर त्यांनी प्रशालेतील गरीब व होतकरू १० विद्यार्थ्यांना शाळेचा युनिफॉर्म देऊ असेही सांगितले. ते पुढे म्हणाले, मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी विद्यार्थी संदिप सामंत हे आपले मित्र असुन त्यांनी या प्रशालेसाठी पुढाकार घेत आपणास मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन सरासरी तीन लाखांची शाळेला दप्तर वाटप करण्यात आली आहेत. यासाठी मळगाव ऐक्यवर्धक संघाचे कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ यांनी सुध्दा वेळोवळी पाठपुरावा केला होता. या पुढेही आपण मदत करण्याचा प्रयत्न करू,असेही गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश तिवरेकर यांनी तर मारुती फाले यांनी प्रास्ताविक व या सहकार्याबद्दल आभार मानत कौतुकही केले.










