
वैभववाडी : सांगुळवाडी येथील श्री अंबरनाथ राणे महाराज मठात दत्तजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. भाविकांच्या अलोट गर्दीत हा सोहळा संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणे दत्त जयंतीचा उत्सव यांचा येथील श्री अंबरनाथ राणे महाराजांच्या मठात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दत्तजन्मोत्सवानिमित्त सकाळी मठात पुजापाठ करण्यात आला.दुपारी महाआरती झाली. यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. सायंकाळी मठामध्ये दत्त जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाळणागीतही म्हणण्यात आली.यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. दत्त नामाच्या जयघोष करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात पालखीची भव्य अशी मिरवणूक काढली होती. रात्री डबलबारी भजनाचा सामना झाला. यावेळी भजन रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्त जयंती उत्सवाला कोल्हापूर, पुणे, मुंबईसह अन्य भागातून भाविक आले होते. राणे महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दत्त जन्मोत्सवासाठी संपूर्ण मठाला विद्युतरोषणाई करण्यात आली होती.