
दोडामार्ग : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. गावातील श्री खंडोबा मंदिरातून या दौडची सुरूवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात व जयघोषात न्हाऊन निघाला. रविवारी सरगवे पुनर्वसन गावात नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रौ गावातील सर्व घरांसमोरील अंगणात शिवाय रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली.
रविवारी सकाळी वाजता गावातील श्री खंडोबा मंदिरापासून दौडची सुरूवात झाली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले. लहान, युवा वर्ग व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पुरुषांनी सदरा, पायजमा तर महिलांनी नऊवारी साडी असा पारंपारिक पेहराव केला होता. यावेळी एका धारकरीला भगवा फेटा बांधून तिच्या हातात भगवा ध्वज दिला. सुवासिनींनी ध्वजधारी धारकरीची पाद्यपूजा केली. ध्वजाला हार घालून नारळ वढविला व आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हर हर महादेव असा उद्घोष करत दौडला प्रारंभ झाला.
दौडमध्ये श्री अंबादेवी, श्री दुर्गादेवी यांचाही उदोउदो करत गावातील प्रत्येक रस्त्यावरून दौड काढण्यात आली. घरासमोर दौड येताच घरातील उपस्थित सुवासिनींनी ध्वज धारकरीची पाद्यपूजा करून आरती ओवाळली. त्यानंतर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दौड आली. यावेळी प्रेरणा मंत्र म्हटला व ध्वज काठीवरून उतरवून दौडची सांगता करण्यात आली.