
मंडणगड : अऱबी समुद्राच्या किनाऱ्यालागून जाणाऱ्या बाणकोट ते वेळास या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची यंदाचे पावसात दुरावस्था झाली आहे. बाणकोट कस्टम ऑफिस ते वेळास दांडा या अंतरातील रस्त्याकरिता पुर्ण कॉक्रीटीकृत संरक्षक भिंतीची मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहेत.
मात्र शासन वा संबंधीत यंत्रणेने या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचे काळात सार्वजनिक बांधकाम विभाग मंडणगड यांच्यामाध्यमातून या अंतरातील काही ठिकाणी संरक्षक भिंत व रस्ता सदृढीकरणाचे काम हातात घेण्यात आले होते. मात्र तुटक तुटक स्वरुपात होत असलेले काम समस्येची तीव्रता कमी करण्यासही उपयोगाचे नाही. सागरी सिमांचे दृष्टीने विचारत करता रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेले वेळास हे गाव एका अर्थाने देशाचे शेवचे टोक म्हणावे लागले. पेशव्याचे कारभारी नाना फडणवीस यांचे मुळ गावे असलेल्या या गावाने बदलत्या काऴत सागरी कासव संवर्धन मोहीमेमुळे आपले नाव जगाच्या नकाशावर पोहचवले आहे. जैवविविधतने नटलेल्या या गावाचा पर्यटन विकासही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यामुळे गावास जोडणार एकमेव रस्ता सुस्थितीत असावा या मागणीकरिता ग्रामस्थ नेहमीच आग्रही असतात. खराब रस्त्यामुळे गावात येणाऱ्या पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्याचे विपरीत परिणाम गावाचे पर्यटनावर होत आहेत.
अरबी समुद्राच्या अगदी किनाऱ्यावरुन जाणारा हा रस्ता लाटापांसुन सुरक्षित असणे गरजेचे आहे या रस्त्यास जागोजागी मातीचे जुने बांधरे बांधले आहेत व वर्षानुवर्षांचा सागरी लाटांचा मारा सहन करण्यास ते सक्षम नाहीत. सुमद्राची पाणी व किनाऱ्यावर लोटांबरोबर वाहून येणाऱ्या वस्तुंमुळे दरवर्षी किनाऱ्या लगतचे या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य तयार होते पर्यटन व नागरीकांना या घाणीतूनच प्रवास करावा लागतो यंदा लाटामुळे व वेळोवेळी भरणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने गावाची महत्वाची गरज लक्षात घेऊन सागरी लाटांपासून सुरक्षित राहील असा तीन किलोमीटर लांबीचा सिमेंट कॉक्रीटच्या संरक्षक भिंती असलेला रस्ता मंजुर करुन त्याचे काम तातडीने सुरु कऱण्याची मागणी समस्याग्रस्त ग्रामस्थांमधून केली जात आहे.