
दोडामार्ग : काजू "बी" ला प्रति किलो २०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी रविवारी संतप्त झालेल्या काजू बागायतदार शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत दोडामार्ग बाजारपेठेतील पिंपळेश्वर मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्त्यावरच ठाण मांडून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत आपल्या मागण्यांची जोरदार घोषणााजीही केली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे चौकातील चारही मुख्य रस्ते चक्का जाम होऊन रस्त्यांवर वाहतुक कोंडी झाली. मात्र जनतेची गैरसोय नको सरकारने वेळीच जागं व्हावं अन्यथा पुढच्या वेळी थेट राष्ट्रीय मार्गावर हा रास्ता रोको होईल असा सडेतोड ईशारा शेतकऱ्यांचे नेते विलास सावंत यांनी दिला आहे.
काजू पिकाला शासनाने हमीभाव जाहीर न केल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धारही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला. काजू "बी" ला प्रति किलो २०० रुपये हमीभाव शासनाने द्यावा अशी मागणी काजू व फळबागायतदार संघटना करत आहे. या मागणीसाठी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात शेतकऱ्यांनी यापुर्वीही एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. मात्र, शासन स्तरावर कोणतीही हालचाल झाली नाही. शेतकऱ्यांच्या मागणीची लोकप्रतिनिधी दखल घेत नव्हते. काजू "बी" ला सध्या बाजारात ११५ ते १२० रुपये प्रति किलो दर आहे. शेतीला येणार खर्च पाहता हा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही.
परिणामी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ही बाब अनेकवेळा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलु. मात्र, शेतकऱ्यांच्या या दुखण्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळें न्याय हक्कासाठी व काजूला मागणीसार हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी रास्ता रोको आंदोलन एल्गार छेडण्यात आला. शासनाला जाग आणण्यासाठी हा रास्ता रोको झाला, या आंदोलनात मोठ्या संख्येने संतप्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
आठवडा बाजारात रास्ता रोको ठरला लक्षवेधी
रविवार हातोडामाचा आठवडा बाजार असतो याच दिवशी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काजू बागायतदार शेतकऱ्यांनी रविवारी मोठा आंदोलन छेडलं. हे आंदोलन खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरल. शेकडोंच्या संख्येने दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी काजू बागायतदार आंदोलनात सहभागी झाले होते. दोडामार्ग येथील श्री गणेश मंदिरात सकाळी तालुक्यासहित इतर तालुक्यातील शेतकरी एकवटले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी गणेश मंदिर ते दोडामार्ग मुख्य चौकापर्यंत पायी मोर्चा काढला. "शेतकरी फळ बागायतदार संघाचा विजय असो", "काजूला २०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे" आयात काजुंवर २० टक्के कर लागू झालाच पाहिजे, स्वामीनाथन अहवाल लागू करा या व इतर अनेक घोषणा दिल्या. त्यानंतर मुख्य चौकात आल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. रविवारी दोडामार्गचा आठवडा बाजार असल्याने बाजारात येणाऱ्यांची पंचाईत होऊ झाली. वाहतुकीवरही याचा विपरित परिणाम झाला. चौकातून तिलारी, गोवा, सावंतवाडी व आयीच्या दिशेने जाणाऱ्या चारही प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी तिलारी व गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्याय मार्ग एकेरी वाहनांचा असल्याने तेथेही वाहनांची कोंडी झाली. मात्र शेतकरी व पोलीस यांच्या समन्वयाने हे आंदोलन अवघ्या तासाभरात मागे घेण्यात आले. मात्र या आंदोलनातील आक्रमकता व दाहाकता सरकारसाठी इशारा पुरेशी आहे.
शेतकरी बागायतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातून आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेचे विलास सावंत, चंद्रशेखर देसाई यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पणन मंत्री, कृषी मंत्री व शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी हमीभावासाठी बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसात सरकारचा सकारात्मक निर्णय जाहीर होईल, तोपर्यंत सयंम राखुयात असे पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सांगितल्याने शेतकऱ्यांनी अखेर त्यांचे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.