विभाग नियंत्रकांमुळे रा. प. महामंडळाची सुविधा ऑक्सिजनवर : अनुप नाईक

Edited by: भरत केसरकर
Published on: August 20, 2023 17:02 PM
views 144  views

कुडाळ : बऱ्याच वेळेस शासनाकडून लोकांच्या सेवेसाठी चांगल्या योजना राबविल्या जातात,पण एखाद्या अडेलतट्टू अधिकाऱ्यांमुळे लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तसेच एखाद्या खात्यातील कर्मचाऱ्यांना लोकांना चांगली सुविधा देता यावी यासाठी चांगली यंत्रणा ही उपलब्ध करून दिली जाते, पण ती यंत्रणा ही काही अधिकाऱ्यांना राबविता येत नाही ही शोकांतिका आहे. किंबहुना आपल्याच विश्वात मशगुल असणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता आणि कर्मचारी यांचं काहीच सोयरसुतक पडलेलं नसत,अशीच परिस्थिती सध्या सिंधुदुर्ग विभागात एस.टी. महामंडळात आढळून येत आहे.विभाग नियंत्रकांमुळे सिंधुदुर्ग मधील रा.प.महामंडळाची सुविधा ऑक्सिजनवर असल्याचा एस.टी.कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी घणाघाती आरोप केला आहे.

सध्य स्थितीत शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी असणाऱ्या एस. टी. तुन प्रवास करणाऱ्यांसाठी महिला सन्मान योजना, अमृतमहोत्सव जेष्ठ नागरिक सन्मान आणि जेष्ठ नागरीक सन्मान योजने अंतर्गत मोफत प्रवास,50%सवलत अश्या योजना राबविल्या जात आहेत.ह्या योजना अंतर्गत सेवा बजावत असताना कर्मचाऱ्यांच्या कामातही सुसूत्रता यावी यासाठी android मशीन पूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आल्या तश्याच  सिंधुदुर्ग विभागातही महामंडळा मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.परंतु निष्क्रिय असणाऱ्या विभागनियंत्रकांमुळे या नवीन आलेल्या अँड्रॉइड मशीन वेळेत trainig पूर्ण न झाल्यामुळे धूळ खात पडल्याच चित्र सिंधुदुर्गातील प्रत्येक डेपोत आढळून येत आहे.या मशीन विनावापर पडून आहेत त्याचप्रमाणे जुन्या मशीन प्रत्येक डेपोत कमी असल्यामुळे रोज किमान 20-25 वाहकाना फेऱ्या ह्या विना मशीन कागदी तिकिटांचा(मॅन्युअल ट्रे) वापर करत पूर्ण कराव्या लागत आहेत .

प्रवाशांना देण्याकरिता अश्यावेळी जर योजनेअंतर्गत स्टॅम्प मारलेली तिकीट पुरेशी उपलब्ध नसतील तर रा.प.कर्मचारी आणि प्रवाश्यांनमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत,आणि याला सर्वस्वी जबाबदार हे विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी असुन त्याचा नाहक त्रास हा रा.प.कर्मचारी आणि सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.सिंधुदुर्ग विभागात वेंगुर्ला आगार वगळता इतर आगारात कायमस्वरूपी आगार व्यवस्थापकच उपलब्ध नाहीत आणि ज्यांना तात्पुरता कार्यभार दिला ते आगारात उपस्थितच राहत  नसल्यामुळे रद्द होणाऱ्या फेऱ्या ह्या तर नेहमीचाच प्रश्न झाला आहे,मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नियमाप्रमाणे आगार प्रमुख यांनी कायमस्वरूपी आगारात राहण आवश्यक आहे,यासाठी त्यांना स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे..

आणि अश्या असंवेदनशील अधिकाऱ्यांमुळे खरंतर रा.प.महामंडळाची जनमानसातील प्रतिमा खराब होत आहे.आतातरी विभाग नियंत्रक यांनी सर्व अधिकार्यांना घेऊन रोज आपला दरबार आपल्या केबिन मध्ये भरवून दिवसभर बसण्यापेक्षा थोडस महामंडळाच प्रामाणिक काम करून निदान कर्मचाऱ्यांना मशीन वापराचे ट्रेनिंग देऊन त्या मशीन वापरण्यास बाकीच्या विभागा प्रमाणे सुरुवात करावी जेणेकरून कर्मचाऱ्यात होणारे वादाचे प्रसंग टळतील.नादुरुस्त गाड्या,अपुऱ्या सुविधा,यंत्रणांचा असणारा अभाव या सर्वांवर मात करत रा.प.महामंडळाचे कर्मचारी लोकांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र या सगळ्या कमतरता असताना कधितरी सेवा बजावताना त्यांचा ही नाईलाज होतो आणि एखादी चूक कर्मचाऱ्यांकडून घडते अश्यावेळी कर्मचार्यांना कायद्याचा बडगा दाखवणारे अधिकारी स्वतःची कर्तव्ये मात्र सोईस्कर रित्या विसरतात.पण एस.टी. कामगार सेना कायमच कर्मचाऱ्यासाठी उभी आहे याची जाणीव अधिकाऱ्यांनी ठेवावी. त्यामुळे अधिकाऱयांनी स्वतःची वागणुकीत सुधारणा करून महामंडळाची प्रतिमा जनमानसात चांगली होईल याची काळजी घ्यावी..पुढील 8 दिवसात नवीन मशीन चा वापर योग्य ट्रेनिंग देऊन सुरू न  झाल्यास एस.टी. कामगार सेना विभाग नियंत्रक कार्यालयावर धडक देईल. याचीही नोंद घ्यावी.असा इशारा एस.टी.वाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी दिला आहे.