
सिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्वर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे आतापर्यंत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर चार म्हैसी आणि 3 हजार 195 कोंबड्यांनाही यात आपला जीव गमावा लागलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरांची, मांगरांची, गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, या सर्वा पोटी तब्बल २ कोटी 86 लाख 19 हजार 330 रुपये एवढे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून अजूनही पंचनामे सुरू असून, हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल २ कोटी 86 लाख 19 हजार 330 रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 104 कुटुंबातील 397 व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले असून, अजूनही या सर्व व्यक्ती स्थलांतरित स्थितीतच आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील दत्ताराम लाडू भोई वय वर्ष ६० हे पुराच्या पाण्यात रविवारी वाहून गेले असून, अद्याप पर्यंत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. ते अद्यापही मिळून आलेले नाहीत .तर या पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला आणि कणकवली या तालुक्यांना बसला आहे. कुडाळ पाल मळईवाडी नेरुर क. नारुर येथील रामा आप्पा पालकर यांची एक म्हैस वाहून गेली आहे. तर गौरीशंकर वसंत कदम कुंदे यांच्या 3000 कोंबड्या वाहून गेल्यामुळे मृत झाल्या आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील हनुमंत नवलु पाटील आणि आरोंदा येथील सखाराम केरकर यांच्या दोन म्हैसी वाहून गेल्या. तर कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील अझरुद्दीन मुलानी यांची एक म्हैस वाहून गेली आहे.अल्ताफ मुलांनी यांच्या वीस कोंबड्या, महेश सकपाळ यांच्या 43 कोंबड्या, इमरान मुकादम यांच्या 95 कोंबड्या, संतोष गुरव यांच्या 27 कोंबड्या वाहून गेल्या असून त्या मृत झाल्या आहेत. हे सर्व खारेपाटण येथील राहणारे आहेत. तर बोर्डवे येथील नितीन राठोड यांच्या दहा कोंबड्या वाहून गेल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण 104 कुटुंबातील 397 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. यात वेंगुर्ला तालुक्यातील तीन कुटुंबातील पंधरा व्यक्ती, कुडाळ तालुक्यातील 77 कुटुंबातील 377 व्यक्तींना तर कणकवली तालुक्यातील एका कुटुंबातील पाच व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण बारा पक्की घरे पूर्णतः कोसळली असून या पोटी एक कोटी 49 लाख 8 हजार एवढे नुकसान झाले आहे. तर 198 एवढी पक्की घरे अंशतः कोसळली आहेत यामुळे या पोटी एक कोटी 68 लाख 48 हजार 365 रुपये एवढे नुकसान झाला आहे. तर 38 कच्ची घरे अंशतः कोसळली असून या पोटी ७ लाख 45 हजार 240 रुपये एवढे नुकसान झाले आहे. तर पाच गोटे कोसळल्याने 61 हजार 525 रुपये एवढे नुकसान, 11 मंगल कोसळल्याने चार लाख 66 हजार दोनशे रुपये एवढे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतरच्या पूरस्थितीमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पंचनामे करण्याचे काम अद्यापही सुरू असून, हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, भाजपा नेते निलेश राणे, भाजपा आमदार नितेश राणे, याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते पूरग्रस्त लोकांना मदत व्हावी यासाठी सतत प्रयत्नात आहेत. तर शासनाच्या माध्यमातूनही पूरस्थिती मधील लोकांना लवकरात लवकर मदत देता यावी असे प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरित करण्यात आलेल्यांमध्ये काही जण आपापल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. तर काही जणांना काही संस्थांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.