डॉ.धर्माधिकारी यांना नितेश राणेंनी भरला सज्जड दम

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक संस्थेचे १२ कर्मचारी उद्यापासून सेवा देणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 10, 2023 16:06 PM
views 537  views

कणकवली : माझ्या आमदारकीच्या ९ वर्षाच्या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली नाही,मी विरोधी पक्षात होतो.सरकार कडे मागणी करुनही डॉक्टर आणि रिक्त पदे भरली नाहीत.त्यामुळे आता कारणे सांगून चालणार नाही.सरकार आमचे आहे,माझा पाठपुरावा आहे.तोपर्यंत वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी उद्यापासून सेवा देणार असल्याची माहिती भाजपा आ.नितेश राणे यांनी दिली.रुग्णांना सेवा देताना आता कारणे चालणार नाही,असा इशारा डॉ.धर्माधिकारी यांना आ.नितेश राणेंनी दिला आहे.


कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी रुग्णालय अधीक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,शहराध्यक्ष अण्णा कोदे , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.


कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येऊन २ जुलैला समस्यांबाबत आढावा घेतला होता.रुग्णांना सेवा का मिळत नाही?  उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ओरस किंवा अन्य ठिकाणी पाठवले जाते.या बाबत येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्ग ४ ची रिक्त पदे आणि लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले होते.त्यानुसार सरकारकडून भरती होण्यापूर्वी एका खासगी संस्थेमार्फत कनिष्ठ लिपिक ४ आणि वर्ग ४ साठी ८ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय शासकीय प्रोसेसच्या बाहेर जाऊन घेण्यात आला असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले.


विधिमंडळात आवाज उठवला तर मंत्री कोकणात कोण काम करायला तयार नसल्याचे सांगत होते. टीका करणे सोप आहे, या अगोदर सरकार कडून अपेक्षा केली पण काहीच मिळाले नाही.मात्र,राजकीय इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो. माझ्या बैठकीत नेमकी किती लोक पाहिजे, विचारल्यावर १३ लोकांची मागणी होती. मी एक पाऊल उचललं आहे, ज्या सामाजिक संस्था आहेत,त्याची माणसे ग्रामीण भागात हॉस्पिटल मध्ये येऊन काम करतात. संस्था त्यांना मदत करते. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ४ कनिष्ठ लिपिक आणि  वर्ग ४ ची ८ कर्मचारी येत आहेत.पगार त्यांचा ती संस्था पाहणार आहे.याबाबत सिव्हील सर्जन यांच्याशी चर्चा केली आहे. उद्यापासून १२ लोक काम करणार आहेत.रुग्णांना सेवा देणार आहेत.आपल्या सर्वांच्या वतीने व भाजपाचे कार्यकर्ते ,आम्ही सगळी मदत करतो. मात्र डॉ.धर्माधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन काम केले पाहिजे. यापुढे तक्रारी चालणार नाहीत. काही आवश्यक यंत्र सामुग्री जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देणार आहोत.

डॉ.धर्माधिकारी यांनी निस्वार्थी हेतूने लोकांना सेवा दिली पाहिजे. कमीत कमी रुग्ण बाहेर पाठवले पाहिजेत. याबाबतचा लवकरच पुन्हा आढावा घेऊन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील असे आ. नितेश राणे यांनी सांगितले.