पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत युथ फोरम-देवगडच्यावतीने नाट्य महोत्सव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 23, 2026 12:24 PM
views 104  views

देवगड : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत व युथ फोरम-देवगड या संस्थेच्यावतीने 'देवगड नाट्यकलेला रंगमंचाची साथ' या संकल्पनेला अनुसरुन यावर्षीच्या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य महोत्सवाचे हे द्वितीय वर्ष आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांच्यासह भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा खडपे, जिल्हा बँक माजी अध्यक्ष अॅड.अविनाश माणगांवकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमित साटम, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, भाजप भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, प्रणाली माने, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सव २०२६ चे भव्य उद्घाटन २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे करण्यात येणार आहे. २४ ते २६ एप्रिल या कालावधीत हा नाट्य महोत्सव रंगणार असून या तीन दिवसांत एकूण ७ दर्जेदार एकांकिकांची नाट्यमेजवाणी रसिकांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता न्यू इंग्लिश मीडियम स्कूल नेरुर या संस्थेचे 'देवराई' हे बालनाट्य, रात्री ८ वाजता नाट्यशोध- रत्नागिरी या संस्थेची 'थडगं' ही एकांकिका, तर रात्री ९ वाजता सुमता थिएटर - रत्नागिरी या संस्थेची 'लज्जा सोडून द्यावी' या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता Culturaly correct प्रस्तुत स्पंदन क्रिएटर मुंबई या संस्थेची 'युगानुयुगे तूच' हे एकपात्री दीर्घाक, रात्री ८ वाजता नाट्यसंस्कार, देवगड या संस्थेची 'डंपिंग टुगेदर' ही एकांकिका, तर रात्री ९ वा. युथ फोरम- देवगड या संस्थेचे 'लगोरी' या बालनाट्याचे सादरीकरण होणार आहे. यादिवशी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते 'नाट्य गौरव पुरस्कार- २०२६' चे वितरण होणार आहे. तसेच सरस्वती अॅकॅडमीचे सुहास जोशी यांच्या संकल्पनेतून देवगडच्या नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा विशेष सन्मान यावेळी संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे.

नाट्य महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री समर्थ कलाविष्कार-देवगड या संस्थेच्या संदुक (देवगड) या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 'संदूक' या नाट्य कलाकृतीने नुकत्याच पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले असून या नाटकात देवगडमधील कलाकारांचा सहभाग आहे.या नाट्य महोत्सवासाठी शेठ म. ग. हायस्कूल येथे भव्य रंगमंच उभारण्यात आला असून महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा नाट्य महोत्सव यशस्वी होण्यासाठी युथ फोरम देवगडचे सर्व सदस्य व नाट्य महोत्सव समिती विशेष मेहनत घेत आहेत.या नाट्य महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.या नाट्य महोत्सवांतर्गत नाट्य कलाक्षेत्रातील नामवंत कलाकाराला पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते नाट्य गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात येणार आहे,अशी माहिती युथ फोरम- देवगडचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.