
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी तहसील कार्यालयात अर्ज छाननी पार पडली. यामध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्याशिवाय भाजपतर्फे शहर विकास आघाडीच्या तीन उमेदवारांच्या अर्जावर प्रतिज्ञा पत्राच्या मुद्द्यावर तर शहर विकास आघाडीतर्फे भाजपच्या एका उमेदवारावर काही माहिती लपविल्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. हे सर्व आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाकडून तीन हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकती प्रभाग ३, ५ व ६ या तीन प्रभागातील शहर विकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात होत्या. या हरकतींचा निर्णय दोन तासांसाठी राखून ठेवण्यात आला होता. या हरकती प्रतिज्ञा पत्राशी संबंधित होत्या. मात्र या तिन्ही हरकती फेटाळला गेल्या. प्रभाग ११ मध्ये काही माहिती लपविल्याबाबत शहर विकास आघाडीतर्फे भाजप उमेदवाराविरोधात आक्षेप घेण्यात आला होता. मात्र हा देखील आक्षेप फेटाळण्यात आला.
दरम्यान शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नरवडे यांच्यावर आक्षेप घेतला होता. नलावडे यांना यापूर्वी एका गुंन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्याचे पारकर यांच्या वकिलांचे म्हणणे होते. मात्र सदर शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिली असल्यास निवडणूक लढवता येते, असे नलावडे यांच्या वकीलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यानुसार पारकर यांचा हा आक्षेप देखील फेटाळण्यात आला.










