डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आयोजित समूहगीत स्पर्धेत निरवडे - आजगाव - आंबोलीचं सुयश

Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2024 06:50 AM
views 129  views

सावंतवाडी : येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समितीने दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या महिलांच्या समूह गीत गायन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत निरवडे संघाने प्रथम, आजगाव संघाने द्वितीय, तर आंबोली संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ही स्पर्धा येथील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात महात्मा ज्योतिबाफुले यांच्या जयंतीचे औचित्य  साधून घेण्यात आले होती. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या पदाधिकारी शुभदादेवी खेमसावंत-भोसले यांच्या हस्ते  मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष केशव जाधव, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, सचिव विनायक जाधव, खजिनदार लक्ष्मण कदम व मान्यवर उपस्थित. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कर्तुत्वाचा आढावा घेऊन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली व नेमळे येथील कोरोनात वडील दगावलेल्या पारस शंकर जाधव व पियुष या बंधुना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली व महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर घेण्यात आलेल्या समूहगीत गायन स्पर्धेत सुमारे 14 संघाने दर्जेदार गीते सादर केले. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध शाहीर व गीतकार जनिकुमार कांबळे व  अनिल आचरेकर यांनी केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण जयंती कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. स्पर्धा दरम्यान गोव्यातील प्रसिद्ध गायक राजेंद्र तोरस्कर यांच्या भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. सकाळी सुरू झालेल्या स्पर्धा स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. उत्तेजनार्थ  महिला समूह नेमले व एकता महिला समूह मळगाव यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत जगदीश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव यांनी केले