
सावंतवाडी : तालुक्यातील चुरशीची ठरत असलेल्या माजगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचारात युतीच्या पॅनलनं आघाडी घेतली आहे. भाजप व बाळासाहेबांचे शिवसेनेच्या सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अर्चना रामचंद्र सावंत यांनी 'डोअर टू डोअर' प्रचारावर भर दिला असून प्रचारात आघाडी घेतली आहे. माजगाव ग्रामस्थांच्या आशीर्वादानं ग्रामपंचायतीत युतीच्या सरपंचांसह गाव विकास पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास युतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी संपूर्ण माजगांव गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. यासाठी गावाच्या विकासाची धुरा सुशिक्षित आणि विचारी माणसांकडे देण्याची गरज आहे. गावाच्या समस्या सोडविण्यासाठी गावासाठी झोकून देणारे आणि गावाच्या विकासाची जाण असणारे तरुण तडफदार कार्यक्षम उमेदवार युतीने दिले आहे. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना गावाची सेवा करायची संधी द्यावी, सामान्य जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असलेल्या या सर्व उमेदवारांना तुमचा पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता येत्या १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील असं मत माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी व्यक्त केले.
तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने व सामाजकार्याची आवड आहे. माझा शिक्षण व अनुभवाचा फायदा गावच्या विकासासाठी होण्यास मी कटिबद्ध आहे. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना नेत्यांची साथ आम्हाला आहे. त्यामुळे नारळ चिन्हा समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करतील, तसेच भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅंनलच्या १३ ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील असा दावा सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, पत्नीसह युतीच्या पॅनलच्या विजयासाठी भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस रामचंद्र ऊर्फ अजय सावंत यांनी मैदानात उतरत डोअर टू डोअर'प्रचारावर भर दिला आहे. ते म्हणाले, कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी कोकणच्या विकासाचा घेतलेला ध्यास व आमच्या गावातील माजी जि. प. अध्यक्ष रेश्मा रविकांत सावंत व पं. स. सदस्य श्रीकृष्ण सावंत, माजी सभापती अशोक दळवी यांनी माजगांव गावामध्ये राबविलेली अनेक विकास कामे या सर्वांच्या विकासाचे स्वप्न एकच असून त्याचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले भाजप पुरस्कृत माजगांव गाव विकास पॅनल निवडून देणे ही काळाची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद हे तीन भाग असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपकडेच येणार आहे. केंद्रात सत्ता भाजपची आहे. पालकमंत्री सुद्धा भाजपचेच आहेत. त्यामुळे विकासाची कामे करण्यासाठी ग्रामपंचायत पण भाजपकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. अर्चना सावंत यांच्यासह युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देतील असे मत अजय सावंत यांनी केले आहे. सोमवारी माजगावात दळवी वाडा, कुंभारवाडा आदी भागासह वाडीवस्तीत युतीच्या उमेदवारांनी प्राचार करत गाव पिंजून काढला. यावेळी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.