
वेंगुर्ला : येथील डॉ. गद्रे आय केअर अँड लेजर सेंटर, वेंगुर्ला मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णांना मोफत सुविधा मिळणार आहेत. डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयात या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फलकाचे अनावरण करून करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,
डॉ. गिरीष गद्रे, डॉ. अनिरुद्ध तेली, राजेंद्र म्हेत्रे, उदय दाभोलकर, वैभव पाटील व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांच्या डॉ. गद्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. गद्रे आय केअर अँड लेजर सेंटर, वेंगुर्ला मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार, रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रिया, नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शन ची सोय, लासरू (अश्रूपिशवी) वरील शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या अपघातावरील उपचार, तिरळेपणा वरील शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार, १८ वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. तर वरील सुविधा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अगदी मोफत मिळणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.