
सावंतवाडी : जिल्ह्यातील शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीचे स्वरूप बदलून ते आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील एखाद्या गाववजा शहरासारखे होत आहे. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरात 'बाहुबली संस्कृतीची' सुरुवात झाली असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. डॉ. परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले की, नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेला लागलेले गालबोट आणि निर्माण झालेला तमाशा पाहता हा संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमानच आहे," या निवडणुकीमुळे शांत, सुसंस्कृत सावंतवाडीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संस्कृतीप्रमाणे बाहुबली संस्कृतीची सुरुवात झाल्याचे दिसून आले.
भूमाफिया आणि अंमली पदार्थ तस्करी करणारे बाहुबली गेली अनेक दशके तेथे राजकारणात सक्रिय होतेच, पण आता सावंतवाडीत देखील ह्या संस्कृतीची नांदी अधिक स्पष्टपणे दिसू लागली. त्यामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम या ठिकाणी दिसून येणार आहेत."हळूहळू युवकांकडे रिव्हॉल्व्हर्स सावंतवाडीमध्ये दिसू लागतील आणि मर्डर देखील झाले तर आश्चर्य वाटायला नको,"
केवळ १९,५०० मतदार संख्या असलेल्या 'क' श्रेणीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एखाद्या पक्षाकडून मतदारांना अवैधरितीने वाटण्यासाठी २० ते २५ कोटी रुपये आणले जातात, "तेंव्हा येनकेन रितीने सत्ता हस्तगत करून पुढील पाच वर्षांत दोनशे अडिचशे कोटी लुटण्याचा कुटील डाव त्यामागे असतो हे निश्चित," असतो. त्यामुळे आता खरा खेळ सुरू होईल आणि सावंतवाडीतील सामान्य जनतेला तो बघत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय नसेल.










