
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे निवडणूका जवळ आल्या की आश्वासनाची खैरात करतात, मतदार जनतेला स्वप्न दाखवणे हा त्यांचा पूर्णवेळ धंदा आहे.पत्रकार परिषदा घेऊन आता तेच करत आहेत असा टोला उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी हाणला आहे.
ते म्हणाले, आतापर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काय केले? किती रोजगार निर्माण केले? जनतेच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी काय केलं? असं जर विचारले तर त्याचे उत्तर काहीच नाही असं आहे.खरं तर गेली पंधरा वर्षे या मतदारसंघातील जनतेने त्यांना सातत्याने विधीमंडळात पाठवले पण गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक विकास केला, मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं आहे.मतदारसंघातील जनता त्यांची आता खिल्ली उडवत आहे, चष्मा, सेटटाॅप बाॅक्स,चांदा ते बांदा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आता आडाळी एम आय डी सी, जर्मनीत नोकऱ्या हे विनोदाचे विषय झालेले आहेत.तसं म्हटलं तर आंबोली चौकूळ कबुलायतदार हा विषय च्यूईंग गम प्रमाणे दर निवडणुकीत ते चघळताना दिसतात, निवडणुका पार पडल्या की त्या विषयावर पडदा पडतो.आंबोलीचा पर्यटन विकास त्यांनी कसा केला हे आंबोलीतील बंद पडलेला MTDC प्रकल्प दररोज ओरडून सांगत आहे.काहीही असो प्रचंड महागाई, बेरोजगारी, युवकांचे अपघाती मृत्यू या सगळ्या नकारात्मक वातावरणात सामान्य जनतेची करमणूक मात्र होत आहे असा टोला डॉ जयेंद्र परुळेकर यांनी लगावला आहे