
मंडणगड : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" ह्या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके यांनी आपल्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सदर कार्यक्रमाचे संकल्पना स्पष्ट करून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या आवडीच्या पुस्तकांचे सामूहिक वाचन केले.
त्यानंतर वाचन कौशल्य कार्यशाळा अंतर्गत सहा. प्रा. अमोल राजे शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी वाचन कौशल्य विकसित व सुधारण्यासाठी विविध प्रकारचे उदाहरणे देत वाचनाविषयी गोडी लागावी व वाचनातून होणारे फायदे तसेच आपल्या जीवनामध्ये वाचन संस्कार कसे आत्मसात करावे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दीपक रावेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके तसेच मंगेश ठसाळे, सायली घाडगे व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.