
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.
या पदाचा कार्यभार डॉ. गिरीषकुमार विवेकानंद चौगुले, वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांचेकडे देण्यात आलेला होता. प्रभारी म्हणून ते सेवा देत होते. डॉ. ज्ञानेश्वर अर्जुन ऐवळे, वैद्यकीय अधिकारी, गट-अ, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांचेकडे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-१ व आहरण व संवितरण अधिकार या पदाचा कार्यभार या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत देण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली. डॉ. ऐवळे यापूर्वी वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर डॉ. चौगुले यांनी प्रभारी म्हणून कारभार हाकला. नुकतेच सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आरोग्य सुविधांप्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा डॉ. ऐवळेंकडे अधिक्षक पदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.