डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणावेत : वीरसिंग वसावे

Edited by:
Published on: April 13, 2025 14:06 PM
views 130  views

सिंधुदुर्ग : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन वेचले. 'शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ' हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला आहे.  जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग, नगरपंचायत कुडाळ,नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, सिंधुदुर्ग भारत हाऊस आणि गाईड ,राष्ट्रीय छात्र सेना, कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ' जय भीम पदयात्रेच्या ' उद्घाटन प्रसंगी श्री वसावे बोलत होते.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कुडाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद नातू , जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड , कुडाळ हायस्कूलचे पदाधिकारी आणि विद्यार्थी  उपस्थित होते. 

 पदयात्रेच्या सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.ही पदयात्रा कुडाळ हायस्कूल येथून सुरू झाली.  या पदयात्रेत NCC, NSS, scout Guide तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.  या पदयात्रेची सांगता रेल्वे स्थानक रोड नजीक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.