
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज सकाळी ९.०० वाजता अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेचे संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, मानद अधीक्षक संदीप साटम तसेच शाळा समितीचे सदस्य मंगेश लोके विशेष उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सागर करडे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या वतीने अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आदरपूर्वक पुनःस्मरण केला.