
सावंतवाडी : मुलांवर गुणांच्या अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या कलेला प्रोत्साहन दिल्यास ही मुले भविष्यात राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू, उत्कृष्ट कलाकार तसेच यशस्वी उद्योजक होऊन आपल्या शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल उज्जवल करतील असे प्रतिपादन बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी केले. विलवडे शाळा नं. १ च्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विकास बडवे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम दळवी, विलवडे पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप दळवी, सोनू दळवी, माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, मोहन दळवी, बांदा केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, माजी केंद्र प्रमुख संदीप गवस, पोलीस पाटील पांडुरंग कांबळे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष विजय गावडे, सचिव रुपेश परब, परेश धर्णे, शाळा नं २चे मुख्याध्यापक सुरेश काळे, पालक विलास दळवी, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक शिक्षक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी विनायक दळवी आणि संदीप गावडे, प्रकाश दळवी यांनी शाळेच्या कला, क्रिडा व शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करीत या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले. यावेळी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. शाळेच्या अखंड बक्षिस योजनेसाठी विनायक दळवी यांनी आपले वडील कै यशवंत दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २५ हजार, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुप्रिया सुरेश सावंत ४० हजार तर शाळेच्या कार्यक्रमासाठी संदीप गावडे यांनी ५ हजार रुपयांची देणगी दिली. वार्षिक पारितोषिक वितरणानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उपस्थित रसिकांची मध्ये जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक पंडित मैंद, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर गवस यांनी केले.